Thursday, 28 May 2026

मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य

 मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य

- मंत्री नितेश राणे

मुंबई, दि.२७ : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

मंत्रालयात महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ स्थापनेनंतर झालेल्या कार्यवाहीबाबत आढावा बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळ अधिनस्त नोंदणीकृत मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. मंडळाच्या माध्यमातून कामगारांना अधिकाधिक लाभ मिळतील. यासाठी प्रशासनाने पारदर्शक आणि उत्तरदायी पद्धतीने काम करावे. तसेच जास्तीत जास्त मच्छिमारांची नोंदणी करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग व कामगार विभाग यांनी संयुक्तपणे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रलंबित लेखापरीक्षण आणि न्यायालयीन प्रकरणे वेळेत निकाली काढण्यावरही भर दिला जाईल. तसेच कामगार मंत्री यांच्याकडे याविषयी लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000

आंबा आणि हापूस आंब्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत

 नाफेड किंवा एनसीसीएफमध्ये ग्रेडिंगच्या नावाखाली माल निकृष्ट दर्जाचा दाखवून खरेदी नाकारली जाते, अशी शेतकऱ्यांची तक्रार असते. यावर उपाय म्हणून आता यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळणार असल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आंबा आणि हापूस आंब्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले. विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटींमध्ये बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर केंद्रीय मंत्र्यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक

 कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरही सकारात्मक निर्णय झाले असल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नाफेड आणि एनसीसीएफने सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता, थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. २ लाख टनांऐवजी १० लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफने करावी, यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.  सध्या कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशांतर्गत कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही. यासाठी कांदा बियाण्यावर मोठ्या प्रमाणात 'एक्सपोर्ट सरचार्ज' लावला पाहिजे, ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे. तसेच कांद्याचा खरेदी भाव नुकताच वाढवून १५ रुपये ८० पैसे करण्यात आला आहे. तो आणखी कसा वाढवता येईल यावर चर्चा झाली. कांद्याच्या बियाणांवर निर्बंध असले, तरी कांद्याच्या निर्यातीवर (कांदा पाठवण्यावर) कोणतीही बंदी नाही, असे या चर्चेत स्पष्ट करण्यात आले

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल

 ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या

विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा

 

नवी दिल्ली,  दि. 27:  साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन,  व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवर अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 

            नवी दिल्ली, 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यानंतर कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलापटे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा

 

नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस कालपासून दिल्ली दौऱ्यावर असून केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या समवेत काल ऊस आणि कांदा उत्पादकांच्या विविध प्रश्नांबाबत तसेच राज्यातील सिंचन प्रकल्प, जलजीवन मिशनची कामे आदींबाबत महत्त्वपूर्ण बैठका झाल्या होत्या.

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा

 ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा

- मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी

 

मुंबई, दि. 28 : खारघर, नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवन या शासकीय इमारतीची आज पाहणी करण्यात आली. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय समन्वय तसेच प्रशिक्षण उपक्रमांसाठी हे संकुल महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे.

 

यावेळी ग्रामविकास भवनातील विविध प्रशासकीय विभाग, प्रशिक्षण कक्ष, बैठकींसाठी उपलब्ध सुविधा तसेच इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सक्षम व आधुनिक प्रशासकीय यंत्रणा उभारणे आवश्यक असून, त्यादृष्टीने ग्रामविकास भवनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

 

ग्रामीण विकास विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता, समन्वय आणि कार्यक्षमता निर्माण व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

राज्यातील ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रम, प्रशिक्षण प्रक्रिया आणि प्रशासकीय नियोजन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामविकास भवन हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi