Dr. Vijay Athalye.
माणसासारखंच पदार्थांना पण सहजिवन असावे असे मला नेहमी वाटते.. एकमेकांना खमंग खुसखुशीत साथ देत ते एकमेकांमधली रूची वाढवत असावेत..
थोडा वेळ जगन्नाथ दीक्षित, र्ऋतुजा दिवेकर बाजूला ठेवा,
शांततेने वाचा,
Enjoy करा......कारण "ब्राम्हण भोजन प्रीया: असे सुभाषीत आहे"

जसं गोबऱ्या गालाच्या टम्म फुगलेल्या पुरीला साथ द्यावी ती श्रीखंड, बासुंदीनेच..
कोणात तिचे लाड पुरवायची ताकद नाही..
सौंदर्यवती जिलबीला साजेसा राजस जोडीदार म्हणजे मसाले भातच.. बाकी मठ्ठा म्हणजे तिचा सेवक.. तिचं सगळं सगळं एकणारा..
पुरणपोळीच्या सुखदुःखात तिला साथ देते प्रत्यक्ष तिची सवत कटाची आमटीच.. काही लोक तिला आमरसाचं स्थळ आणू पाहतात पण ते काही खरं नाही..
ढोकळा या पदार्थांच्या अंगात इतक्या नाना कळा आहेत ना.. त्या सहन कराव्या त्याच्या girlfriend चिंच खजुराच्या चटणीनेच.. दोघं एकत्र आले की धमाल करतात..
मिसळ बहुधा मेषेची किंवा सिंह राशीची असावी.. तिच्या जहालपणाशी समतोल ठेवतो तिचा लाडका पाव.. मुळातच शांत स्वभावाचा.. काही कमी पडू देत नाही तो तिला..
उपम्याचा मात्र वरचष्मा शेवेवर.. तिला काही भाव खाऊ देत नाही तो..
इडली, डोसा, सांबार, चटणी सगळे एकत्र सुखाने नांदतात.. अगदी न भांडता..
लोण्याने तर जणू जन्म भराच्या आणाभाका घेतल्या असाव्यात थालीपीठासोबत..
चिवडा आणि चकली मात्र खेळगडीच.. आपल्याच मस्तीत खेळणारे.. जणू चिवडा खेळ हरायला लागला की चकलीला चिडवत असावा चक चक चकली..
मोठ्या घरचा लाडू कधीकधीच खेळायला येतो त्यांच्यासोबत.. आणि लाडू बेसनांकडचा असेल तर त्याची आई त्याला बेदाण्याची तीट लावून मगच बाहेर पाठवत असावी..
शंकरपाळी अन् करंजी सारख्या भांडतात.. एका वेळी खेळायला येत नाहीत..
ह्या सगळ्यांमध्ये सोज्वळ ब्रम्हचारी एकच.. ऊकडीचा मोदक.. त्याचा दिमाखच वेगळा.. नाही म्हणायला तुपाकडून सेवा करुन घेतो.. पण जोडीदार मात्र कोणी नाही त्याचा.. तो असाच एकटा.. अनभिषिक्त राजासारखा...!!
सर्व खादाडांकरता