गेवराई तालुक्यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी
उपाययोजना करा
– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि.29 : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पाणीपुरवठा समस्या तातडीने सोडवाव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे सन २०२५ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी अनुषंगाने बैठक झाली. या बैठकीस आमदार विजयसिंह पंडित, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील अधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
गेवराई तालुक्यातील विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजना, तसेच प्रलंबित कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांमध्ये गुणवत्ता राखून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.