उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बावीस वर्षांनंतर महाराष्ट्र कसा असावा, याचे स्पष्ट चित्र या व्हिजनमधून दिसते. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन राज्याला दिशा देणारा हा आराखडा आहे. मोठी स्वप्ने ठेवली तरच पुढे जाता येते. शासनासोबत प्रशासनाची जबाबदारीही महत्त्वाची आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद या व्हिजनमध्ये आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवणे हाच मुख्य उद्देश आहे.
‘विकसित महाराष्ट्र व्हिजन २०४७’ ही केवळ कागदावरची योजना नसून प्रत्यक्षात कार्यान्वित होऊन महाराष्ट्राचा विकासाचा वेग वाढवेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या व्हिजन डॉक्युमेंटमुळे पुढील दोन दशकांमध्ये महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती निश्चित होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.