सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 27 September 2024
सेना दलात अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण
सेना दलात अधिकारी पदाचे
मोफत पूर्व प्रशिक्षण
मुंबई, दि. २६ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन मुंबई शहर सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ ते २३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ५८ आयोजित करण्यात आला आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणासह निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-५८ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थी कंम्बाईड डिफेन्स सहींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेले असावे व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. प्रशिक्षणार्थी एनसीसी 'सी' सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी प्रशिक्षणार्थ्याकडे एस. एस. बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी प्रशिक्षणार्थीकडे एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. आणि 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.
राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल
राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल
- पर्यटनमंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळ पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. आगामी काळात पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यावर पर्यटन विभागाचा भर असुन लवकरच विविध सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी आहे. या दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकुट पर्यटक निवास, वेरुळचा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभारंभ केला. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.
मंत्री श्री.महाजन म्हणाले की, युनेस्कोने इ.स. 1983 मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला आहे. लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याच्या सोयी मर्यादित असल्याने पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महामंडळाने या ठिकाणी 4 हजार 13.23 चौमी एवढया जागेत अद्ययावत असे पर्यटक निवासाचे बांधकाम केले आहे. 20 खोल्या, 2 डॉरमेट्री, 1 उपहारगृह, 1 किचन, स्वागतकक्ष इत्यादी सोयी उपलब्ध आहेत. पर्यटक निवास बांधण्याकरिता 7 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. सर्व खोल्या या वातानुकुलित असुन भव्य असे 2 लोकनिवास महीला आणि पुरुषांसाठी तयार करण्यात आले आहेत. भांडारकक्ष, स्वच्छतागृह, अपंगांसाठी स्वच्छतागृह, स्वागतकक्ष, व्यवस्थापक कक्ष याचाही यामध्ये समावेश आहे.
पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या की, राष्ट्रकुट पर्यटक निवासामुळे वेरुळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या आणि घृष्णेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची उत्तम दर्जाची सोय होणार आहे. येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही लेण्यांच्या सानिध्यात राहण्याची संधी उपलब्ध होणार असून छत्रपती संभाजीनगर शहरापासुन वेरुळ जवळच असल्याने पर्यटक या ठिकाणी राहण्यास जास्त पसंती देतील.
व्यवस्थापकिय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की, पर्यटक निवासाच्या समोरच हेलीपॅड असून जवळच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्रही आहे. पर्यटक निवासामध्ये विविध सोयी असल्याने पर्यटकांना राहण्याचा आनंद घेता येणार आहे. तसचे सदरचे पर्यटक निवास हे वेरुळ लेण्यांच्या अगदी समोरील बाजुस असल्याने पर्यटकांना निवासाच्या खोल्यांमधून आणि छतावरुन लेण्यांचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे.
राष्ट्रकूट पर्यटक निवासाचे व्यवस्थापन महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंद्रशेखर जयस्वाल आणि प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक हरणे हे करीत आहेत.
*****
नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करावे
नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांचे
महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करावे
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २६ :- जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या कामांमुळे सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार असल्याने बळीराजा सुखावणार आहे. या प्रकल्पांची कामे गतीने व्हावीत यासाठी संबधित महामंडळांनी सूक्ष्म नियोजन करून त्याची गतीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित जलसंपदा विभागाच्या बैठकीस आमदार तथा महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्यासह महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नियामक मंडळाच्या बैठकीत कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी ठेवलेल्या विविध विषयांना मान्यता देण्यात आली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जलसंपदा हा मोठा विभाग आहे. राज्यात विभागाच्या अनेक मालमत्ता असून या मालमत्तेची एकत्रित नोंदणी असणारी माहिती असणे आवश्यक आहे. अशी माहिती तयार करण्यासाठी विभागाने कार्यवाही सुरू करावी. सर्व महामंडळांची ही माहिती एकाच नमुन्यात असावी. कालवे, सिंचन प्रकल्प व जलसंपदा विभागाच्या अन्य कामांसाठी भूसंपादन होऊन जमीन महामंडळास उपलब्ध होते. या जमिनीचा मोबदला अदा करताना काही ठिकाणी अडचणी येतात. यासाठी जागा ताब्यात घेतेवेळी महामंडळाने संबंधित जागेची ड्रोनद्वारे छायाचित्रे काढावित. त्यामुळे संबंधित जागेचा मोबदला देताना कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जलसंपदा विभागाकडील प्रकल्पासाठी पुनर्वसन झालेल्या गावातील रस्ते यापुढे सिमेंटचे करावेत, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि
शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे रात्री ८ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय जाधव उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीष गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
दि. २७ व २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत.