स्त्री शिकली कि घर शिकते. स्त्री
आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यानंतर ती सक्षम असते. कोणत्याही अडचणीवर मात करायला तयार असते. त्यामुळे स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे, या हेतूने भाजप - शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना स्वयंरोजगारासाठीच्या वस्तू मोफत देण्याचा निर्णय केला. महापालिकेचा वाटप कोटा वाढवला. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात या वस्तू वाटप करता आल्या, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमाननगर येथे महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप मशीन वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार भातखळकर यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रमाणात या वस्तू वाटप करण्यात येत आहेत, हे केवळ शिंदे-फडणवीस सरकारमुळे शक्य झाले आहे. वस्तूच्या पाच टक्के रक्कम भरून लाभार्थ्यांना वस्तू देण्याचा निर्णय बदलून वस्तू पूर्णतः मोफत देण्याचा निर्णय घेतला. महिलांना आता या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. यातून त्यांच्या घराला काही ना काही हातभार लागणार आहे.
महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण योजना अंतर्गत महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.