Friday, 9 June 2023

नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती

 नवी मुंबई डाक विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांची भरती


            मुंबई,दि.९: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याअंतर्गत नवी मुंबईच्या अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील ४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ११ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


            इच्छुक उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ जून २०२३ असून इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिशः आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. या भरतीबाबतच्या अधिसूचनेतील सूचनांनुसार शुल्क भरावे लागणार आहे.


            पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही फोन कॉल करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती,नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता इतरांसमोर उघड करू नयेत आणि कोणत्याही बनावट फोन कॉल्सपासून सावध राहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in/ संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन वाशी डाक कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.


००००

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरवात

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेस सुरवात


       मुंबई, दि. ९ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.


            माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ www.dvet.gov.in व https://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.



0000


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला गती

 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला गती द्यावी


पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये


एनईपी अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करावा


- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील


             मुंबई, दि. ९ : राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला गती देण्यासाठी सुकाणू समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘एनईपी’ अंमलबजावणीसाठी अंतिम आराखडा तयार करावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.


            राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात सुकाणू समिती आणि सर्व कुलगुरूंची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.


            मंत्री श्री. पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तयार केले आहे. या धोरणानुसार बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना, संधी, समानता, समावेशकता, आणि शैक्षणिक दर्जा,नवीन संशोधन ही उद्दिष्टे ठेवून भारतीय शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे धोरण तयार करण्यात आले आहे. यावर्षी सर्व अकृषी विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालये आणि ज्या संस्थांनी शैक्षणिक उपाययोजना केली आहे अशा संस्थांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. पुढील शैक्षणिक वर्षात सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये १०० टक्के या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी दि.३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्व विद्यापीठांनी संभाव्य अडचणींचा आणि उपाययोजना यांचा अभ्यास करून दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अंमलबजावणी करण्यासाठी अंतिम आराखडा व अनुषंगिक धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


            या धोरणाची अंमलबजावणी करत असताना विद्यार्थी, पालक, प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी यावर सकारात्मक दृष्टिकोनातून सर्व विषयांवर सकारात्मक धोरण ठरविले जाईल, असे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.


            सर्व विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी व पदव्युत्तर स्तरावर सुधारित अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात गेल्या वर्षापासून विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. गठित केलेल्या सुकाणू समितीने गेल्या सहा महिन्यांपासून सर्व विद्यापीठांचे कुलगुरु, प्र-कुलगुरु, अधिष्ठाता व अन्य संबंधित घटकांशी चर्चा करून सुधारित अभ्यासक्रम आराखडा तयार केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्यापीठ परिसरातील शैक्षणिक विभाग व राज्यातील पारंपरिक स्वायत्त महाविद्यालयांत पदवी व पदव्युत्तर स्तरावरील बी.ए., बी. कॉम व बी.एस्सी तसेच एम.ए., एम.कॉम व एम.एस्सी व दि.२० एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेले अन्य पारंपरिक अभ्यासक्रम आणि सर्व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर एम.ए., एम.कॉम व एम.एस्सी अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार निश्चित केलेल्या क्रेडीट आराखड्यानुसार राबविले जातील. उर्वरित अस्वायत्त संलग्नित महाविद्यालयात सध्या सुरु असलेले अभ्यासक्रमच राबविले जातील. आज झालेल्या बैठकीत सर्व कुलगुरुंनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलात आणण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी करण्यासाठी अधिक कालावधी लागणार असल्याचे सांगितले आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.


सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेली घटना दुदैवी,


दोषींवर कठोर कारवाई केली जाईल - मंत्री चंद्रकांत पाटील


            सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेली घटना वेदनादायी असून याची शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्च शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.


केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकिंग जाहीर होणार


            भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या मानांकनाचा सन २०२३ चा अहवाल केंद्र सरकारने जाहीर केला आहे.यामध्ये यात महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि संस्थांचा क्रमांक वरच्या यादीत असला पाहिजे यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांचे रँकिंग जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.पाटील यांनी केले.


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची बैठक


            राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली.


            उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक विनोद मोहितकर, शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, एम.जे. कॉलेज जळगावचे निवृत्त प्राचार्य अनिल राव, उद्योजक महेश दाबक, एसव्हीकेएमचे अध्यक्ष डॉ. माधव एन वेलिंग यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत


राज्यातील अकृषी विद्यापींठाच्या सर्व कुलगुरुंची बैठक


            या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ.आर.के. कामत, गोंडवाना विद्यापीठाच कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरचे डॉ. सुभाष चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


०००

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन

 शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदानाचे अर्ज३० जूनपर्यंत करण्याचे आवाहन


            मुंबई, दि. ९ : अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगर परिषद शाळा व दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सन २०२३-२४ वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे.


            मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी परिपूर्ण अर्ज जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दि. ३० जून २०२३ पर्यंत सादर करावेत. त्यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांनी सांगितले.

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 . झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


            मुंबई दि. ९ : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी पात्र मदरशांकडून दि. ३० जून, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.


            राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांनी के

ले आहे.


सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय*

 *सुटलेलं पोट कमी करण्यासाठी १० प्रभावी घरगुती उपाय*


आपण सुरुवातीला वजन वाढण्याकडे लक्ष देत नाहीत परंतु जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी घाम गाळत बसाव लागत. या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही लवकर वजन कमी करू शकता.


*1. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, दालचिनी या पदार्थांमुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत मिळते.*


*2. आहारात मिठाचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा*. कारण मिठातील सोडियममुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा वाढतो.


*3. रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यानं शरीराची पचनक्रिया वाढते. ज्यामुळं आपलं वजन कमी होण्यास मदत होते.*


*4. आहारात साखरेचे प्रमाण जितके कमी करता येईल तेवढे करा.* *साखरेऐवजी गुळ अथवा मधाचा वापर नक्कीच करू शकता.*


*5. आहारात नियमितपणे दही असेल तर त्यामुळे सडपातळ होता येईल.* पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी *कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्यामुळे* पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.


*6. पूर्ण झोप झाली नाही* तर वजन वाढतं. झोप चांगली झाली तर पचनक्रिया वाढते आणि अतिरिक्त चरबी वाढत नाही. *सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने आपलं वजन कमी होण्यास मदत होते.*


*7. योगा केल्याने वजन घटण्यास मदत होते. पोट कमी करण्यासाठी नौकासन योग सर्वोत्तम आहे*. 


कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मिठ मिसळून घ्या. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिजम चांगले राहाते आणि सोबतच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.


*8. वजन कमी करायचे असल्यास स्वत:ला पहाटे पायी चालण्याची सवय लावा* यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.


 *9 _रात्री उशिरा जेवन केल्याने पोटावरील चरबी वाढते_ .* त्यामुळे रात्री झोपण्याच्या २ तासाआधी जेवा.


*10. रात्रीचं जेवणा मध्ये हलका आहार घ्या. तेलकट, मसालेदार जेवण करू नका.* झोपण्याआधी शतपावली कण्यास विसरु नका. यामुळे पोटावर आलेली चरबी कमी होण्यासाठी मदत होईल.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,




मूल मतिमंद असण्याचे कारण काय ?*

 *➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*

   *मूल मतिमंद असण्याचे कारण काय ?*

*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖*


बुद्ध्यांक ७० पेक्षा कमी असलेली मुले मतिमंद (Mentally retarded) समजली जातात. मतिमंदपणा हा आजार नसुन अनेक कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे. 


जन्मापासून वा लहानपणापासून दिसून आलेला बौद्धिक विकासाचा अभाव, दैनंदिन आयुष्यातील तडजोडी न करता येणे या सर्वाच्या एकत्रित परिणामाला मतिमंदत्व असे म्हणतात.


मतिमंदत्व ही एक मोठ्या प्रमाणावर आढळणारी समस्या आहे. जगातील ३% व्यक्ती मतिमंद असतात. भारतात सुमारे २.५ कोटी व्यक्ती मतिमंद असाव्यात, असा अंदाज आहे.


शरीरातील गुणसूत्रात होणाऱ्या बदलांमुळे वा रोगांमुळे मूल मतिमंद होऊ शकते. गरोदरपणामध्ये रूबेला, सायटोज्दुब्लो विषाणू यांचा संसर्ग झाल्यास तसेच काही औषधे घेतल्यास वा एक्सरे सारख्या किरणोत्सर्गाचा दुष्परिणाम झाल्यास जन्मणारे मूल मतिमंद होऊ शकते. 


जन्माच्या वेळेस झालेली दुखापत, प्राणवायुचा अभाव इत्यादी मुळेही मतिमंदत्व येऊ शकते. मेंदूचा जंतुसंसर्ग, डोक्याला इजा-अपघात, शिसे व पारा यांमुळे झालेली विषबाधा यांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते. 


बाळंतपणाच्या वेळी ४० वर्षाहून जास्त वय असलेल्या मातांची मुले मतिमंद निपजण्याची शक्यता जास्त असते. मातेचे कुपोषण, बालका मधील कुपोषण, आयोडीनचा अभाव, जवळच्या रक्ताच्या नात्यात होणारी लग्नं; अशा कारणांमुळेही मतिमंदत्व येऊ शकते.


एकदा मतिमंदत्व निर्माण झाल्यावर उपचार करणे कठीणच असते. त्यामुळे मतिमंद मुले जन्माला येणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणे योग्य होईल.


गरोदरपणात मातेला व्यवस्थित पोषण देणे, क्ष किरण तपासण्या टाळणे, प्रौढावस्थेत मातृत्व टाळणे, गर्भास हानीकारक औषधी न देणे, रुबेला सारख्या रोगाची प्रतिबंधक लस देणे, आयोडीनचा पूरक पुरवठा करणे, प्रसूतीपूर्व सेवा योग्य रीतीने पुरवणे; या उपायांमुळे मतिमंद मुले जन्माला येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.


*डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन*


*➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



Featured post

Lakshvedhi