वसंतोत्सवासाठी सज्ज !
- भवताल, बायोस्फीयर्स सोबत सृष्टीची उधळण अनुभवणारl
‘ऋतुंचा राजा’ असं वसंत ऋतुला का म्हटलं जातं? हे अनुभवण्यासाठी ‘भवताल’ तसेच ‘बायोस्फीयर्स’ टीम आणि सोबत येणारे निसर्गप्रेमी सज्ज झाले आहेत. हे सर्व जण उद्या, रविवारी (५ मार्च २०२३) मुळशी-ताम्हिणी खोऱ्यात जाणार आहेत आणि सृष्टीतील वसंतोत्सव अनुभवणार आहेत.
वनस्पतींची नवी पालवी, वातावरणात सुगंध पसरवणारा फुलांचा विविधरंगी बहर, त्यावरील कीटक-पक्ष्यांचा गुंजारव, या जीवांचा एकमेकांशी असलेला संबंध, पुढची पिढी प्रसवण्यासाठी त्यांचं सुरू असलेलं नियोजन, या दिवसांतील पठारांची पिवळी-तांबूस झाक... अशी सृष्टीची अनेक रूपं पाहणं, ती समजून घेणं आणि जोडीला गर्द देवराईचा अनुभव या सर्व गोष्टींनी ‘भवताल’चा उद्याचा ‘वसंतोत्सव’ रंगणार आहे. सोबत जैवविविधतेचे प्रसिद्ध तज्ञ व ‘बायोस्फीयर्स’चे डॉ. सचिन पुणेकर आहेत.
लोकांना महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अनुभव देणं आणि असा हा आगळावेगळा महाराष्ट्र जगापुढे नेणं हे ‘भवताल’चं एक उद्दिष्ट आहे. त्यासाठीच हटके ‘थीम’ असलेल्या इको-टूर्स आयोजित केल्या जातात. त्यातूनच ‘वसंतोत्सव’ या टूरचा जन्म झाला. हा अनुभव घेण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र, हा पहिलाच ‘वसंतोत्सव’ असल्याने छोटी टीम घेऊन जात आहोत. इतरांनाही पुढे संधी मिळेल हे निश्चित... या उत्सवाचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवूच, जोडलेले राहा!
#भवताल #बायोस्फायर्स #वसंतोत्सव.
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com