शहरांमध्ये ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक, लहन मुले यांचे हाल होत आहेत. मात्र यासंदर्भात शासनाचे सुस्पष्ट धोरण नाही. या संदर्भात राज्य स्तरावर समिती गठीत करून भटक्या कुत्र्यांसाठी केंद्र उभी करून यातून सामान्य भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सामान्य नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली. याला मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक उत्तर देत महिन्याभरात या संदर्भातील समिती गठीत करून यामध्ये अधिकाऱ्यांसह या क्षेत्रात काम करणारे, एनजीओ यांचाही अंतर्भाव करणार असल्याची माहिती दिली.
सभागृहात लक्षवेधी मांडत असताना आ. भातखळकर म्हणाले, भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने तत्काळ राज्यस्तरीय समिती गठीत करावी. शहरामध्ये ठिकठिकाणी विशेषत: रहिवासी सोसायट्यांमध्ये, पदपथ, रस्त्यांवर अशा भटक्या कुत्र्यांचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना होतो. अनेकदा कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीर आतापर्यंत किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले, याची निश्चित संख्या सरकारकडे आहे का, यासाठी एक विशेष मोहीम सरकार सुरू करणार आहे का, आणि सरकारने म्हटल्याप्रमाणे समिती कधीपर्यंत गठीत करणार, या समितीमध्ये या विषयात काम करणाऱ्यांचे सल्ले घेणार का, खासगी एनजीओची मदत घेऊ न भटक्या कुत्र्यांसाठी केंद्र उभी करता येतील अशा प्रकारची सूचना स्वीकारण्याची मानसिकता राज्य सरकारची आहे का, असे प्रश्न आ. भातखळकर यांनी उपस्थित केले.
यावर उत्तर देताना मंत्री विखे-पाटील म्हणाले, भटक्या कुत्र्यांचा विशेषत: शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊ न येणाऱ्या महिन्याभरात समिती गठीत करणार आहे. यामध्ये या क्षेत्रात काम करणारे, एनजीओ यांचाही अंतर्भाव करणार आहे. त्यांच्या सूचना स्वीकारण्यास राज्य सरकार सकारात्मक आहे. याशिवाय श्वान दत्तक योजना सुरू करता येईल का, याबाबतही सकारात्क विचार करून लवकरच समिती गठीत करू.
No comments:
Post a Comment