Thursday, 26 March 2026

*फॉर्म नंबर 121 बाबत…* सर्व पेन्शनर्सना नमस्कार,

 *फॉर्म नंबर 121 बाबत…*


सर्व पेन्शनर्सना नमस्कार,

   सर्व पेन्शनरांना सेवानिवृत्ती नंतर मिळालेल्या पैशांची त्यांनी बॅंक, पोस्ट, म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल. तर त्यावर मिळणारे व्याज हे आयकराच्या कक्षेत येते. आपल्याला मिळणारी पेन्शन व इतर सर्व मार्गाने आपल्या नांवावर जमा होणाऱ्या उत्पन्नावर आपला आयकर (TDS) ॲडव्हान्समध्ये कापून घेतला जातो. रिटर्न फाईल केल्यानंतर जास्तीचा कापून गेलेला आयकर रिफंड स्वरूपात परत मिळतोही... परंतु यात एक वर्षाचा कालावधी जातो. 

    आता आर्थिक वर्ष संपायला नऊदहा दिवसच बाकी राहिले आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते... मग लगबग चालू होते, पेन्शनरांची बॅंकेत, पोस्टात जाऊन स्व-घोषणा पत्र 15G/ 15H फॉर्म भरून देण्याची… काहींना तर हे माहीतही नसते...

   इन्कम टॅक्स कपात होऊ नये म्हणून दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला हे फॉर्म भरून देण्याची पूर्वी पध्दत होती. परंतु पुढील आर्थिक वर्षापासून १ एप्रिल २०२६ पासून आयकर विभागाने आयकर नियमात बरेचसे बदल केलेले आहेत. व काही फॉर्मही बदली केले आहेत. आतापर्यंत ६० वर्षांखालील भारतीय नागरिकांना आयकर कपातीसाठी 15G फॉर्म तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ भारतीय नागरिकांना 15H हा फॉर्म असे वेगवेगळे फॉर्म भरून द्यावे लागत होते. हे फॉर्म भरताना बऱ्याच गोष्टींचा यामध्ये उल्लेख करावा लागत असे. परंतु आता वेगवेगळे फॉर्म न भरता, सर्वांसाठी एकच.. *फॉर्म 121* हा स्वयं- घोषणापत्र फॉर्म भरून द्यावा लागणार आहे.

पाहूया या फॉर्मविषयी माहिती…!


   मित्रांनो, मी यापूर्वी इन्कम टॅक्सच्या जुन्या व नवीन करप्रणाली विषयी माहिती दिली होती. व कोणती करप्रणाली फायदेशीर ठरते हेही सांगितले होते. आता आपण पाहणार आहोत फॉर्म 121 विषयी…

   ज्यांचे वेतन, पेन्शन, बॅंक खात्यातील व मुदत ठेवीवरील व्याज, भाडे, लाभांश अशा सर्वं मार्गाने मिळणारे एकूण उत्पन्न करमुक्त मर्यादेत असेल त्यांचा TDS (आयकर) कपात होऊ नये म्हणून या आर्थिक वर्षापासून दरवर्षी हा फॉर्म संबंधित बॅंक, पोस्टात भरून द्यावा लागणार आहे. 

    आपली पेन्शन व ज्या खात्यात आपण मुदत ठेवी (एफ.डी.) ठेवतो त्यावरील व्याज हे आयकर उत्पन्नात मोजले जाते. परंतु आपली उत्पन्न मर्यादा करयोग्य उत्पन्नापेक्षा (१२ लाख ७५ हजार पेक्षा) कमी असेल तर आयकर कपात होऊ नये यासाठी हा फॉर्म वेळेतच, एप्रिल महिन्यात संबंधित बॅंक शाखेत, पोस्टात भरून द्यावा लागतो. ज्यांनी कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले असतील, म्युच्युअल फंडात पैसे ठेवले असतील व त्यातून उत्पन्न मिळत असेल तर त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना फॉर्म भरून देण्याची गरज नाही. त्यांनी फक्त ज्या बॅंकेत डीमॅट खाते असेल तेथे एकच फॉर्म भरून द्यावा.

    आपला पॅन आधारशी व सदर खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. या फॉर्ममध्ये A आणि B असे दोन पार्ट आहेत. यातील A पार्ट आपण भरून द्यायचा आहे. B पार्ट बॅंक भरेल. 

नांव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन नंबर इत्यादींचा उल्लेख करावा लागतो. 

    सर्व मार्गाने मिळणारे एकूण अंदाजित उत्पन्न यात लिहावे लागणार आहे. एफ.डी. नंबर, किती रकमेची एफ.डी. वगैरे लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त अंदाजित व्याज लिहावे लागणार आहे. वेगवेगळ्या बॅंक, पोस्ट यामध्ये एकूण किती फॉर्म भरले ते लिहावे लागेल. उदा. १,२,३ वगैरे… आणि सर्वात शेवटी मागील दोन वर्षांचा आयकर रिटर्न तपशील लिहावा लागतो. यामध्ये निव्वळ करयोग्य उत्पन्न व किती कर लागला एवढेच लिहायचे आहे. 

    शक्यतो सर्वांनी नवीन करप्रणालीच निवडावी. जुन्या करप्रणालीनुसार वेगवेगळ्या कलमांखाली वेगवेगळ्या गुंतवणूकीवर आयकर सवलत मिळत असली तरी आयकर मर्यादा फक्त २.५० ते ३ लाखांपर्यंतच आहे. व कराचा दरही जास्त आहे त्यामुळे यामध्ये कर जास्त भरावा लागतो. याऊलट नवीन करप्रणालीत चालू आर्थिक वर्षापासून १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न+ ७५ हजार रुपये स्टॅंडर्ड डिडक्शन असे एकूण १२ लाख ७५ हजार रुपये एकूण उत्पन्न करमुक्त आहे. परंतु नवीन करप्रणालीत कोणत्याही गुंतवणूकीवर सवलत मिळत नाही.‌        

    या फॉर्ममध्ये माहिती भरताना चूकीची भरू नये. हा फॉर्म टॅक्स वाचवण्यासाठी नसून, अनावश्यक टॅक्स कापून जाऊ नये यासाठी स्वघोषणा पत्र म्हणून भरून द्यायचा आहे. फॉर्म मध्ये चुकीच्या रकमांची नोंद केल्यास दंडही भरावा लागू शकतो. फॉर्म भरण्यापूर्वी संपूर्ण फॉर्म व सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. यासाठी सोबत फॉर्म 121 ची pdf पाठवित आहे.

    सर्व माहिती सुटसुटीत करून सांगितली आहे तरीही समजली नसल्यास अधिक माहितीसाठी आपल्या आर्थिक सल्लागार किंवा CA ची मदत घ्यावी.    

    *-- श्री. अशोक खिलारी.*

(सर्व मित्र/नातेवाईकांना शेअर करा)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi