राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड
नवी दिल्ली,२१: प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६ चे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धे'च्या विभागीय स्तरावरील फेऱ्यांची यशस्वी सांगता झाली असून, महाराष्ट्रातील दोन शाळांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून राज्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम विभागातून महाराष्ट्राच्या संजीवनी सैनिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, कोपरगाव (अहिल्यानगर) या शाळेच्या मुलांच्या ब्रास बँड पथकाने आणि डॉन बॉस्को हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, विक्रोळी (मुंबई) या शाळेच्या मुलींच्या ब्रास बँड पथकाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय बालभवन येथे या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून देशातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करण्याचा उद्देश केंद्र सरकारद्वारे निश्चित करण्यात आला आहे.
यंदाच्या स्पर्धेत राज्यस्तरावर देशभरातील ७६३ शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी विभागीय स्तरावर ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ८० पथकांनी, ज्यामध्ये २,२१७ विद्यार्थ्यांचा समावेश होता, आपली कला सादर केली. कडक निकषांनंतर आता अंतिम फेरीसाठी देशभरातून एकूण १६ उत्कृष्ट पथकांची निवड करण्यात आली आहे.
अंतिम फेरीचे मूल्यांकन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली आहे. यामध्ये भारतीय भूदल, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल.
प्रत्येक श्रेणीतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५१,००० रुपये, ३१,००० रुपये आणि २१,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. तसेच, उर्वरित सहभागी संघांना ११,००० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे.
0000
No comments:
Post a Comment