कोविड काळात उभारलेले ऑक्सिजन प्लांट
सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालविण्यास देणे विचाराधीन
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
नागपूर, दि. १२ :- राज्यात कोविड काळात अत्यावश्यक म्हणून उभारण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) चालविण्यास देणे विचाराधीन असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
कोविड काळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट संदर्भात सदस्य एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर,सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले की, कोविड काळात सुरू करण्यात आलेले ऑक्सीजन प्लांट सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) चालविण्यास देण्याबाबत बैठक घेण्यात आली असून याबाबतचा आराखडा करण्यात आला आहे.
खासगी भागीदारी तत्वावर (पीपीपी) देण्यात येणारे ऑक्सिजन प्लांट आपत्कालीन परिस्थितीत पुन्हा शासनास वापरण्यास मिळतील असे सांगत मंत्री आबिटकर म्हणाले, कोविड काळात सुरू करण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट कोणत्याही परिस्थितीत विनावापर रहाणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकांनी कोविड काळात उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटबाबत असाच निर्णय घेण्यासाठी कळविले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोविड काळात ऑक्सिजन प्लांट उभारणीमध्ये ज्या ठिकाणी अनियमितता झाली असेल त्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
००००
No comments:
Post a Comment