छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी
राज्य शासन कटिबद्ध
- राज्यमंत्री पंकज भोयर
नागपूर, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने प्रसार व्हावा, याबाबत राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार असल्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितले.
सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. यावेळी सदस्य अमोल मिटकरी, ज.मो.अभ्यंकर यांनी चर्चेत सहभागी झाले होते.
राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा योग्य, सखोल व प्रेरणादायी परिचय मिळावा याचे महत्त्व सांगितले जाणार आहे.
राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे ‘द राईज ऑफ मराठा’ हे स्वतंत्र प्रकरण सीबीएसई अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्याचे पंकज भोयर यांनी सांगितले.
एनसीईआरटीकडे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अधिक समृद्ध माहिती समाविष्ट करावी, अशी राज्याची मागणी असल्याचे कळविण्यात आले आहे.
राज्यातील शाळांमध्ये ‘शिवचरित्र वाचन’ उपक्रमाची कल्पना सकारात्मक असल्याचे सांगत, शिक्षण विभागाशी चर्चा करून हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित अनेक योजना सरकारने राबविल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना, छत्रपती शिवाजी महाराज महा-राजस्व समाधान शिबिरे या योजनांच्या माध्यमातून सरकार प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय सुविधा पोहोचवण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
००००
No comments:
Post a Comment