मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहीद झालेल्या सैनिकाच्या जीवनाचे मोल करता येणे शक्य नाही. मात्र त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी शासनाच्यावतीने 25 लाख रुपये देण्यात येत होते. यामध्ये ४ पटीने वाढ करण्यात येऊन एक कोटी रुपये करण्यात आले आहे. शासनाकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्यात येते. सेनेप्रती भाव असलेले अनेक नागरिक आपल्या रोजच्या मिळकतीमधून ध्वजदिन निधीसाठी पैसे देत असतात. हा निधी सत्कारणी लागतो, या निधीमधून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये जगाने भारतीय सेनेचा पराक्रम बघितला आहे. त्यानंतर भारतीय सेनेचा शक्तिशाली देशाच्या सेनेमध्ये समावेश झाला आहे. भविष्यातही कुठलेही आव्हान आल्यास भारतीय सेना ते पेलण्यासाठी सक्षम आहे. सेनेच्या शौर्याने आपण देशाच्या सर्व सीमा सुरक्षित ठेवत आहोत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी काढले.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी आपापल्या परीने सहभाग देऊन सेनेप्रती आपला भाव व्यक्त करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा बॅच लावून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला. नागपूर जिल्ह्याने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तथा अन्य विभाग प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.
No comments:
Post a Comment