डाळिंबाची प्रतवारी व प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार
2017-18 मध्ये काही तांत्रिक कारणामुळे अमेरिकेला भारतातून डाळिंब निर्यात बंद झाली होती. परिणामी जवळपास सहा वर्षे भारतीय डाळिंब अमेरिकन बाजारपेठेत पोहोचू शकला नव्हता. निर्यात पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या अपेडा व राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी (यू.एस.डी.ए.) तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर सातत्याने चर्चा करून कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावर आवश्यक चाचण्या घेऊन अहवाल सादर केले. पॅक-हाऊसमध्ये डाळिंबाची प्रतवारी व प्रक्रिया आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली. त्यानंतर यू.एस.डी.ए. व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर विकिरण प्रक्रिया पार पाडण्यात आली. 4,800 बॉक्सेसमधून 17,616 किलो (सुमारे 17.6 मेट्रिक टन) डाळिंब निर्यात करण्यात आली आहे.
सन 2024 मध्ये अमेरिकेने निर्यातीसाठी काही शास्त्रीय निकष लागू केले आहेत. यामध्ये माईट वॉश प्रोटोकॉल, सोडियम हायपोक्लोराईडद्वारे निर्जंतुकीकरण तसेच वॉशिंग व ड्रायिंग प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच डाळिंबाचे चार किलो क्षमतेच्या प्रमाणित बॉक्समध्ये पॅकेजिंग करून अधिकृत विकिरण सुविधा केंद्रात विकिरण प्रक्रिया करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रिया यूएसडीए व एनपीपीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष तपासणी व मान्यतेनंतरच पूर्ण केल्या गेल्या आहेत.
या प्रसंगी यूएसडीए निरीक्षक रॉबर्टो रिवाझ, एनपीपीओचे डॉ. बी.एल. मिना, कृषी पणन मंडळाचे विभाग प्रमुख अनिमेष पाटील, अपेडाचे बामणे तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment