नागपूर, दि. १० : केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्र या उद्दिष्टपूर्तीत एक पाऊल पुढे असून महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. राज्य शासनाने राबविलेल्या दूरदृष्टी धोरणांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातून नक्षलवाद संपूर्ण संपुष्टात आणण्यासाठी अति दुर्गम भागात पोलीस चौकी सुरू कराव्यात. सर्व पोलीस चौकीमध्ये आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करून सर्व सुविधा देण्यात याव्यात. नक्षलवाद मुक्त झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पोलीस चौकी झालेल्या ठिकाणी विविध कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा कार्यक्रमांमध्ये शासकीय योजनांचा लाभ गावकऱ्यांना देण्यात यावा. येथील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक उत्पादनांना विक्रीसाठी बाजारपेठ निर्माण करून द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
No comments:
Post a Comment