नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात अनियमितता नाही;
महिला तक्रारीवरील तपास अंतिम टप्प्यात
- मंत्री डॉ. उदय सामंत
नागपूर, दि. १२ : नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात आर्थिक अनियमितता प्रकरणी पोलीस चौकशीत संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार कोणतीही अनियमितता आढळली नाही. महिला तक्रारीवरील प्रकरणाची चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील आर्थिक अनियमितता व सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याविरुद्धच्या तक्रार प्रकरणी सदस्य कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ.सामंत यांनी उत्तर दिले.
आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आर्थिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले की, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देयके योग्य प्रक्रियेनुसार मंजूर करण्यात आली आहेत. देयकांमध्ये कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे नमूद केले आहे. तसेच, संबंधित देयके संचालक मंडळाच्या ठरावानेच मंजूर करण्यात आली होती, असे या अहवालात नमूद केल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
महिला तक्रारीवरील प्रकरणावर रस्तोगी समितीमार्फत चौकशी सुरू आहे. वरिष्ठ महिला अधिकारी या समितीत असून ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. या समितीचा अहवाल शासनाकडे आल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment