मुंबईतील 20 हजार इमारतींना भोगवटा देण्याच्या
निर्णयाची आजपासून अंमलबजावणी
- मंत्री डॉ. उदय सामंत
नागपूर, दि.12 : बृहन्मुंबई महानगर क्षेत्रातील तब्बल 20 हजार इमारतींना भोगवटा देऊन दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानसभा सदस्य मंगेश कुडाळकर, मुरजी पटेल, अनंत नर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री डॉ. सामंत म्हणाले की, मुंबईकरांची गेल्या ५० वर्षांची मागणी काल उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात पूर्ण केली. या निर्णयाचा थेट लाभ 4 ते 5 लाख सदनिकांना म्हणजेच जवळपास 20 लाख नागरिकांना होणार आहे. याबाबत, मुंबईच्या आयुक्तांना तातडीने अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असल्याचे मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.
या निर्णयामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेले पुनर्विकास, बँक कर्ज, खरेदी-विक्री आणि विविध परवानग्यांवरील अडथळे दूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना पूर्वीप्रमाणे व्यवहार करता येणार असून विकासकामांना गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यासाठी एक खिडकी योजना उभारणी करण्यासाठी शासन लवकरच निर्णय घेऊन मुंबईकरांना त्रास होणार नाही, त्या दूर केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment