कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात
१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी
मुंबई, दि.१४ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
यंदाच्या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून, ६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरे, तर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असून, ते सलग १४ दिवस सर्वेक्षण करतील.
कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. राजरत्न वाघमारे, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठार, दूरदर्शन प्रतिनिधी डॉ. आलोक खोब्रागडे, आकाशवाणी मुंबईचे राजेश शेजवले, अलर्ट इंडियाचे वरिष्ठ प्रोग्रामर विन्सेंट के. ए., ‘अपाल’चे अध्यक्ष माया रणवरे, महाराष्ट्र कुष्ठ पीडित संघटनेच्या सदस्या मदिना शेख, राज्य जागरण समिती सदस्य विकास सावंत या बैठकीला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment