एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
· दैनंदिन बैठका, उद्दिष्टनिश्चिती, नव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा, ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते.
दैनंदिन बैठकींनी प्रशासन सज्ज
एसटी स्वतःला ‘चल संस्था’ म्हणून परिभाषित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावे, यासाठी सकाळी १० वाजता आगारात, ११ ला विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली आहे.
प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी, या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा आदेश बैठकीत दिला.
संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आगार, विभाग व प्रदेशस्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून बाजारपेठांपर्यंत आणि शालेय सहलींपासून आकस्मिक गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज राहणार आहे.
No comments:
Post a Comment