सातारा जिल्ह्यातील मुनावळे प्रकल्पासाठी
आवश्यक मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने राबवावी
- मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले
मुंबई, दि. 4 : सातारा जिल्ह्यातील मुनावळे जल पर्यटन प्रकल्पास आवश्यक वन्यजीव व इतर विभागांची मंजुरी घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बोटी, हाऊसबोट आदी साहित्य खरेदी लवकर करावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केल्या.
सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरातील मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाच्या कामाचा आज मंत्री भोसले यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय अधिकारी निलेश गटणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. साताराचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, एमटीडीसीचे विभागीय वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे यांच्यासह इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने मुनावळे प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले वन्यजीव व इतर विभाग परवाने लवकरात लवकर घ्यावेत. तोपर्यंत प्रकल्पासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करावे. हाऊस बोटी, बोटी दर्जेदार असावे, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही मंत्री भोसले यांनी यावेळी केल्या.
No comments:
Post a Comment