जिल्हाधिकारी आंचल गोयल म्हणाल्या, डी-डुप्लिकेशन तंत्रज्ञानामुळे खातेदारांचे स्पेलिंग बदललेले नाव, आडनावातील बदल किंवा वेगळे फोटो असले तरी समान खातेधारक ओळखणे सोपे होईल. या तंत्रज्ञानामुळे अनक्लेम्ड रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल. बँक खातेदारांनीही ई-केवायसी, वारस नोंद आणि पत्त्यामधील बदल बँकेस वेळेत कळविणे आवश्यक आहे. या महत्त्वाच्या कागदपत्रामुळे खात्यातील रकमेची माहिती कुटुंबीयांना सहज मिळू शकेल व खाती निष्क्रीय राहणार नाहीत. तसेच त्या खात्यांमधील रक्कम, खातेदारास, वारसांना तातडीने परत मिळेल, असा विश्वासही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात विविध बँकांमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांमध्ये असलेल्या सुमारे सहा हजार कोटी रुपयांपैकी दोन ते अडीच हजार कोटी रुपये फक्त मुंबईमधील असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावेळी सांगितले. सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेल्या मुंबईत कामासाठी येणाऱ्या आणि नंतर गावाकडे परतलेल्या नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणात निष्क्रिय खाती तयार होतात. ग्रामीण भागात अशा खात्यांचा शोध घेणे सोपे असले तरी महानगरात हे मोठे आव्हान ठरते, असेही आंचल गोयल यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पांचोली म्हणाले, निष्क्रिय खात्यांमधील रक्कम संबंधित व्यक्तीला सुपूर्द करणे महत्वाचे आहे. ते म्हणाले अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता अशा निष्क्रिय खात्यांचा दुरुपयोग होण्याची भीती असते. त्यामुळे खातेदारांनी आपली बँक खाती सक्रिय ठेवण्यासाठी वेळोवेळी केवायसी, ई केवायसी करावी.
No comments:
Post a Comment