गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी
आंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या
मुंबई,दि.24 : गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुमारे 128 एकर जमिनीचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळाप्रमाणे विकास केला जाणार असून, याबाबतचा आढावा पर्यटन, खनिकर्म तथा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. यासंदर्भातील सर्व प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले.
मेघदूत या निवासस्थानी गोराई प्रकल्पाबाबतचा आढावा घेताना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन विभागाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव विजय पोवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले की, गोराई येथील जागेचा विकास करताना तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन पार्क, वॉटर स्पोर्ट्स, रिसॉर्ट तसेच आकर्षक उद्यान आदी पर्यटकांना आकर्षित करतील अशा सर्वच सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील विकासकांना सहभागी करुन घेण्याचे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले. पीपीपी तत्वावर हा प्रकल्प राबविला जावा.शासनाकडून सर्व परवानग्या घेवून हा प्रकल्प अत्यंत आकर्षक असा व्हावा यासाठी पर्यटन विभागाने लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.
मंत्री देसाई म्हणाले की, गोवा,केरळ मध्यप्रदेश येथील पर्यटन प्रकल्पांचाही अभ्यास केला जावा.आंतरराज्य अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन तज्ज्ञ नेमून हा प्रकल्प बनविण्यात यावा. या प्रकल्पाबाबत काम करताना प्रकल्पाशी संबंधित शासनाच्या हक्क आणि अधिकारांशी तडजोड न करण्याच्या सूचना मंत्री देसाई यांनी यावेळी केल्या.
0000
No comments:
Post a Comment