राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार
नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही सन्मान
नवी दिल्ली, 18 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत जलव्यवस्थापन आणि संवर्धन क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये (2024) महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. तसेच उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महापालिकेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार - 2024 प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, जलशक्ती राज्यमंत्री राजभूषण चौधरी, राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, विभागीय सचिव व्ही. एल. कांथाराव व विभागाचे सचिव अशोक, के. के. मीना यावेळी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्यासोबत राज्याच्या जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर उपस्थित होते.
या मानांकन स्पर्धेत गुजरातला दुसरा तर हरियाणाला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपतींकडून विजेत्यांचे अभिनंदन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, आपल्या भाषणात, अमृता इतक्याच मौल्यवान असलेल्या जल संसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचे कौतुक केले. भारतीय परंपरेमधे जलस्रोतांना पूजनीय मानले गेले आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी काम करणारे कौतुकास पात्र आहेत, असे यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या. गेल्यावर्षी सुरू झालेल्या जलसंवर्धन जनसहभाग उपक्रमाद्वारे 35 लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचना उभारल्या गेल्या असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. देशात मर्यादित जलस्रोत असल्याने त्याचा वापर जपून करायला हवा आहे. हवामान बदलाचा जलस्रोतांवर परिणाम होत असून जलस्रोतांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment