Sunday, 5 October 2025

सुधारित : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी pl share

 सुधारित :

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान

अंतिम विशेष फेरी

 

मुंबईदि. ३ : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत आहे. ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या अंतिम फेरीची विद्यार्थीपालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी नोंद घ्यावीअसे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून राज्यामध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत १० फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत.

अंतिम विशेष फेरीची सर्वसाधारण वैशिष्ट्ये

दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० पासून ते ६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणीसह प्राधान्यक्रम भरणे, तसेच प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले आहेत त्यांच्या प्राधान्यक्रम / विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनश्चः रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणानुक्रमे देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांनी विकल्प नोंदविला नाही त्यांना त्या स्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाची अलॉटमेंट करण्यात येणार नाही. तद्नंतरही गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुनःश्च विकल्प नोंदविण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणानुक्रमे देण्यात येईल. उपरोक्त पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालय अलॉट न होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक अलॉटमेंटनंतर विकल्प बदलण्याची सुविधा शेवटच्या विद्यार्थ्यास महाविद्यालय अलॉटमेंट होईपर्यंत देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंटच्या टप्प्यावर महाविद्यालयाची अलॉटमेंट झाल्यास त्यांना पुनःश्च विकल्प भरता येणार नाही. तसेच विकल्प बदलावयाच्या वेळी एसएमएस/ संकेतस्थळावर पाठवण्यात येईल. प्रत्येक स्तरावर विकल्प न बदलल्यास विद्यार्थ्यां प्रवेश घ्यावयाचा नाही असे समजून प्रवेश प्रक्रियेतील त्या टप्प्यावर विद्यार्थ्यांचा विचार प्रवेशाकरीता केला जाणार नाही. उपरोक्त टप्पे पूर्ण झाल्यानंतर एकाच वेळी गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची अलॉटमेंट करण्यात येणार आहे. तद्नंतर प्रत्यक्षात कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याचे वेळापत्रक दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ नंतर देण्यात येईल. त्या दरम्यान प्रवेश करणे आवश्यक असेल.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ही अंतिम फेरी असून यानंतर संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी मंडळाचे अधिकृत पोर्टल-https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी अथवा ई-मेल आयडी- support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन नंबर ८५३०९५५५६४ वर संपर्क साधावाअसे आवाहन राज्य शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi