महानगरपालिकेच्या ए विभागातील महात्मा गांधी मार्ग (मेट्रो चित्रपटगृह ते फॅशन स्ट्रीट) परिसरात लोकसहभागातून सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्ते, पदपथ स्वच्छ करत पाण्याने धुवून काढण्यात आले. यावेळी स्वच्छतेविषयक सामूहिक शपथ घेण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, संपूर्ण देशात तसेच राज्यात आज 'एक तास स्वच्छतेसाठी' अभियान सुरु आहे. हे अभियान वर्षभर सातत्याने सुरु ठेवायचे आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यास देशामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने देशात कोट्यवधी स्वच्छतागृहे उभी राहिली. पिण्याचे शुद्ध पाणी कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. नगरविकास विभागाने घनकचरा टाकण्यात येणारी सुमारे १९ हजार ९४० ठिकाणे शोधून काढली आहेत. त्यांच्या स्वच्छतेचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. राज्यभर स्वच्छताविषयक लोकसहभागाचे ६ हजार ३१७ कार्यक्रम होणार आहेत. स्वच्छता मित्रांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर स्वच्छ हरित महोत्सवदेखील घेण्यात येणार आहे. यासमवेतच प्रभात फेरी, स्वच्छता कामगार सन्मान, पायाभूत सुविधांचे लोकार्पण, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान, सर्वोत्कृष्ट नागरी स्वयंसेवक सन्मान असे विविध उपक्रम ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये राबविले जाणार आहेत, असे देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment