कॅनडातील गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी
विकासातील भागीदारीच्या नव्या उंची गाठतील
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा
मुंबई, दि. १४ :- "राज्य आर्थिक, औद्योगिक, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रातील विकास तसेच पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर आहे. कॅनडा आणि भारत दोन्ही देशातील विविध क्षेत्रात दीर्घकाळ असलेले मैत्रीपूर्ण धोरण अधिक दृढ होत आहेत. या कालखंडात कॅनडातील उद्योजक, व्यापार व गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्रातील संधी या विकासातील भागीदारी आणि सहकार्याच्या नव्या उंची गाठतील", असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तंत्रज्ञान, शिक्षण, वित्त, व्यापार, गुंतवणूक, उद्योग यासह विविध बाबींवर चर्चा झाली. विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या संधींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
कॅनडा सरकारच्या शिष्टमंडळात कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त क्रिस कोटर, इंडो- पॅसिफिक ग्लोबल अफेअर्सचे उपमंत्री ई पी पी वेल्डन, चीफ ऑफ स्टाफ जेफ डेव्हिड यासह वरिष्ठ अधिकारी होते. तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, गुंतवणूक व धोरणविषयक मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग सचिव पी.अनब्ळगन, परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. राजेश गावडे, डॉ. अर्जुन देवरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुंबई ही देशाची आर्थिक, औद्योगिक, करमणूक, स्टार्टअप क्षेत्रातील राजधानी आहे. भारत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होताना यामध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार आहे. राज्याचे उद्योगस्नेही धोरण, तंत्रज्ञान , पायाभूत व ऊर्जा क्षेत्रातील विकासामुळे निर्यात आणि थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र प्राधान्याचे ठिकाण ठरले आहे".
No comments:
Post a Comment