राज्य युवा धोरणासाठी युवकांनी सूचना ऑनलाईन पद्धतीने सादर कररण्याचे आवाहन
राज्यातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या सहभागातून आधुनिक, सर्वसमावेशक तसेच सुधारित राज्य “युवा धोरण” साकारण्यात येत आहे. या अनुषंगाने १३ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींकडून विविध विषयांवरील विचार, मते आणि सूचना ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले.
हे युवा धोरण जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलित राहून युवकांना वैज्ञानिक दृष्टिकोन, वैविध्यतेचे ज्ञान आणि नागरिक जबाबदाऱ्यांची जाणीव यासाठी सक्षम व्यासपीठ देईल. राज्याचे सुधारित युवा धोरण युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले विचार, मते आणि सूचना देण्याचे आवाहन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले.
क्रिडा व युवक कल्याण मंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले की, सामाजिक, शैक्षणिक आणि कौशल्य विकासावरील सूचना या माध्यमातून मागविल्या जाणार आहेत. या धोरणात लिंग, धर्म, जात, भाषा, उत्पन्न, ग्रामीण-नागरी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय सर्व गटांचा विचार करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणताही तरुण तरुणी वंचित राहणार नाही.
युवा धोरणाद्वारे तरुणांना निर्णय प्रक्रियेत सहभाग, शिक्षणाचा हक्क, रोजगार व उद्योजकता संधी, आरोग्य, पर्यावरण, निवारा, कला-क्रीडा आणि सांस्कृतिक सहभाग यांसारखे मूलभूत अधिकार दिले जाणार आहेत, असेही मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
हे धोरण समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रामीण तरुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत,असेही ॲड कोकाटे यांनी सांगितले. महिला व बाल विकास, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास इत्यादी विभागांच्या समन्वयातून नाविन्यपूर्ण युवा योजना सुरू केल्या जाणार आहेत. युवा धोरणात मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, शिक्षण, रोजगार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा व डिजिटल तंत्रज्ञान यांसारख्या नव्या आव्हानांचाही समावेश असेल, असेही मंत्री क्रीडा ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment