इलेक्ट्रिक ट्रक निर्मितीसाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ
· स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’
· दावोस येथे झालेल्या सामंजस्य कराराचे फलित
पुणे दि.१६ : ब्ल्यू एनर्जी मोटर्स निर्मित स्वॅपेबल बॅटरी असलेला इलेक्ट्रिक ट्रक म्हणजे ‘रिव्होल्यूशन ऑन व्हील’ असून त्यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेता येत्या काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई- पुणे इलेक्ट्रीक कॉरिडॉरसारखे अन्य कॉरिडोर करण्यासाठी सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर, धीरेंद्र शास्त्री बागेश्वरबाबा, प्रशांत रुईया, अंशुमन रुईया, अमित बाजाज, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.
ब्ल्यू एनर्जी मोटर्सने इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात नवी क्रांती केली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माल वाहतूक करणाऱ्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात इलेक्ट्रिक ट्रकची आवश्यता होती. कार्गो वाहतूक करणाऱ्या क्षेत्रात ब्ल्यू एनर्जीने अत्यंत उत्तम आणि 'मेड इन इंडिया' ट्रकची निर्मिती केली आहे. ही बाब देशाचे 'मेक इन इंडिया'चे स्वप्न साकार करण्यासारखी आहे.
इलेक्ट्रिक ट्रकसाठी संपूर्ण क्लिष्ट अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची संकल्पना आणि निर्मिती, तंत्रज्ञान देशातच त्यातही महाराष्ट्र आणि पुण्यात निर्माण होणे ही अभिमानाची बाब आहे. दावोस येथे याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला होता. त्यानंतर कंपनीने अत्यंत वेगाने प्रकल्प उभारणीचे काम केले आहे. महाराष्ट्र शासनाने ईव्ही क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण तसेच पर्यायी इंधन धोरण अशी शाश्वत धोरणे स्वीकारली असून या क्षेत्रातील उद्योगाला त्याचा फायदा व्हावा आणि पर्यावरणाचे या माध्यमातून रक्षण व्हावे हे आहे. महाराष्ट्र शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रीक कॉरिडॉरसाठी तसेच अन्यत्रही बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंगच्या कॉरिडॉरसाठी ब्ल्यू एनर्जीसोबत काम करेल. या ट्रकच्या किंमती डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या असल्याने या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, या इलेक्ट्रिक ट्रकसाठी तयार करण्यात आलेले तंत्रज्ञान भारतीय वातावरणाला अनुरूप आहे आणि बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान ईव्ही क्षेत्रातील मोठी क्रांती ठरणार आहे. बॅटरीच्या किंमती कमी होत असून बॅटरीच्या कार्यक्षमतेत, आयुर्मानात वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात बॅटरीच्या साह्याने ट्रक २०० ऐवजी ४०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकेल. हा केवळ ट्रक किंवा इलेक्ट्रीक वाहन नसून ‘सॉफ्टवेअर ऑन व्हील्स’ आहे, जे तंत्रज्ञानाला स्मार्ट बनवण्याचे उदाहरण आहे. कार्गो वाहतुकीत ही टेस्ला चळवळीची सुरूवात आहे असे म्हणता येईल.
हे तंत्रज्ञान किफायतशीर असण्यासोबत त्याची कार्यक्षमताही उत्तम आहे. ट्रकमध्ये बसवलेले सेन्सर आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अधिक भाराचे निदान होईल, ज्यामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात नियंत्रण साधले जाईल.
राज्यात सौर ऊर्जा निर्मितीला गती देण्यात येत असून २०३५ पर्यंत ७० टक्के ऊर्जेचा वापर सौर स्रोताद्वारे करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment