नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्र आणि देशाची अभिमानास्पद ओळख
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देश आणि राज्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन कमळाच्या आकारात असून ते भारतीय संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, लघुउद्योग व निर्यातदार थेट युरोप, मध्यपूर्व यांच्यासह जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील. त्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला होणार आहे. राज्यातील फळे, भाजीपाला व मासे निर्यातीला युरोप व इतर देशात नवीन बाजारपेठ मिळेल. यामुळे नवीन गुंतवणूक आणि उद्योग वाढेल.
२०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज ही संख्या १६० च्या पुढे गेली आहे. उडान योजनेंतर्गत लाखो सामान्य नागरिकांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे. भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक करणारा देश बनला आहे. विमान उत्पादक कंपन्यांकडे सध्या एक हजारहून अधिक नव्या विमानांच्या निर्मितीची मागणी आहे. त्यामुळे पायलट्स, इंजिनीअर्स, केबिन क्रू आणि देखभाल, दुरुस्ती व तपासणी (एमआरओ) सुविधांमुळे हजारो रोजगार संधी उपलब्ध होणार असून भारत हा ‘एमआरओ’ हब होणार आहे. त्याचबरोबर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदरामुळे रोजगार वाढणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment