स्वच्छ भारत मिशन’मध्ये स्वयंसेवी संस्था व
महिला बचत गटांचा सहभाग वाढवावा
- पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई, दि. 14 : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले.
निर्मल भवन येथे आयोजित स्वच्छ भारत मिशनच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार कैलास पाटील, स्वच्छ भारत मिशनचे अतिरिक्त मिशन संचालक शेखर रौंदळ, यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवावा, यासाठी समन्वयाने व एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. या उद्दिष्टासाठी स्वयंसेवी संस्था, कर्मचारी तसेच महिला बचत गटांचा सहभाग वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करून स्वच्छतेबाबत जागरूकता आणि सहभाग वाढवावा.
या मिशन अंतर्गत असलेली सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. सार्वजनिक शौचालयांची कामे गतीने पूर्ण व्हावीत. स्वच्छतेसाठी लागणाऱ्या जागा स्थानिक पातळीवर समुपदेशनाद्वारे उपलब्ध करून घ्याव्यात. तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवाव्यात.
No comments:
Post a Comment