खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा
– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 14 : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट गाव आणि परिसरात तातडीने क्षेत्रीय पातळीवर पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारेपाट परिसरातील पाणीटंचाईसंदर्भात बैठक झाली.
बैठकीस आमदार रवीशेठ पाटील, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन, सहसचिव गीता कुलकर्णी, तसेच मुख्य अभियांता प्रशांत भामरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जनतेसाठी अत्यावश्यक असलेल्या पाण्याचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित राहू नये. अधिकारी व अभियंते यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून जलस्रोत, पाइपलाइन, पंपिंग स्टेशन इत्यादींचा आढावा घेऊन त्वरित सुधारणा कराव्यात. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. शहापाडा परिसरातील सर्व गावे आणि वस्त्यांपर्यंत स्वच्छ आणि पुरेसे पाणी पोहोचेल, यासाठी नियोजन आणि समन्वयांनी कामे करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
OOOO
No comments:
Post a Comment