महाराष्ट्राचे 'व्हिजन डॉक्युमेंट' विकसित भारताचे स्वप्न साकारणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· विकसित महाराष्ट्र २०४७ मसुदा सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई, दि. २० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजे २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचे 'व्हिजन डॉक्युमेंट' निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विकसित महाराष्ट्र २०४७ सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केला.
या बैठकीत विकसित महाराष्ट्र २०४७ मसुद्याला सल्लागार समितीने मान्यता दिली. हा मसुदा मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. या मसुद्यात २०२९, २०३५ आणि २०४७ पर्यंत अशा तीन टप्प्यातील विकसित महाराष्ट्राचे ध्येय गाठण्याचा ' रोडमॅप ' दिला आहे.
बैठकीस कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे उपस्थित होते, तर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. भविष्यात कुठलीही योजना, धोरणे बनविताना या मसुद्याचा उपयोग झाला पाहिजे. हे ' डॉक्युमेंट' महाराष्ट्राला राज्यांसोबत नाही, तर जगासोबत स्पर्धा करण्यास सक्षम बनवेल. या संपूर्ण मसुद्याचे व्हिडिओ स्वरुपामध्येही रूपांतर करण्यात यावे. ज्यातून नागरिकांना सुलभ पद्धतीने तो समजून घेता येईल.
No comments:
Post a Comment