महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत माझगाव डॉक येथे दोन नौकांचे 27 ऑक्टोबर रोजी उद्घाटन
मुंबई, दि. १७ : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खोल समुद्रातील मासेमारीला नवे बळ मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे अत्याधुनिक खोल समुद्रातील मासेमारी दोन नौकांचे उद्घाटन होणार आहे.
हा उपक्रम राज्यातील समुद्री मत्स्यव्यवसायाच्या आधुनिकीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, या प्रकल्पाला राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यांचे आर्थिक साहाय्य मिळाले आहे. या योजनेचा उद्देश मच्छीमार सहकारी संस्थांची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे, भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील संसाधनांचा शाश्वत उपयोग प्रोत्साहित करणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे असा आहे.
राज्यातील सात सागरी जिल्ह्यांतील १४ मच्छीमार सहकारी संस्थांची निवड या योजनेंतर्गत करण्यात आली होती. प्रस्ताव प्रक्रियेनंतर जय मल्हार मत्स्यव्यवसाय विविध कार्यकारी संस्था, मुंबई शहर यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी तयारी दर्शविली होती. एनसीडीसी यांच्या निर्देशानुसार या नौकांचे बांधकाम उडुपी कोची शिपयार्ड लिमिटेड, मालपे (कर्नाटक) येथे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment