शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम आहार पुरवठा व स्वच्छतेबाबत दक्षता घ्या
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
मुंबई, दि. २६ : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम दर्जाचा पौष्टिक आहार पुरवला गेला पाहिजे. तसेच रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
आरोग्यसेवा आयुक्तालय, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत असलेल्या आरोग्य संस्थांमधील स्वच्छता सेवा, धुलाई सेवा, आहार सेवा, औषध पुरवठा आणि मनुष्यबळ सेवा आदी बाबींचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, रुग्णालयात दाखल रुग्णांना पौष्टिक व दर्जेदार आहार मिळाला पाहिजे. रुग्णालय व परिसराची अंतर्बाह्य स्वच्छता ठेवला गेला पाहिजे. तसेच पुरेसा औषधसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. या सर्व बाबींची काटेकोर तपासणी केली जाईल. संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांनी रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा.
रुग्णालयात आलेल्या रुग्णाला प्रसन्न व समाधानकारक वातावरण मिळाले पाहिजे. रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच स्वच्छता सेवेसाठी नियुक्त कंत्राटदार कामगारांना करारानुसार पगार देत आहेत का, याचीही काटेकोर पडताळणी करण्यात यावी, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले
No comments:
Post a Comment