सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड*
सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत नाही, तर आजूबाजूच्या दऱ्या, खोऱ्या आणि घाटांवर ठेवलेल्या नियंत्रणातही दडलेले आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगरी किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस 13 कि.मी. वर हा किल्ला असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची 1,092 मी. आहे. पूर्वेकडील बाजूस 340 मी. आणि पश्चिमेकडे 870 मी. खोल दरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांना 1656 मध्ये हा किल्ला बांधून घेण्याची आज्ञा दिली.
प्रतापगड हा बालेकिल्ला आणि त्याच्या सभोवतालचा खालचा भाग, अशा दोन प्रमुख भागात विभागलेला आहे. डोंगराच्या शिखरावर असलेल्या बालेकिल्ल्यात राजवाडा, सदर, केदारेश्वर मंदिरे, पाण्याच्या टाक्या आणि धान्य-रसद साठवणीसाठीच्या कोठाऱ्या यांसारखी महत्त्वाची बांधकामे होती. तर दक्षिण व पूर्व उतारावर बांधलेल्या खालच्या भागात पहिली तटबंदी आणि प्रचंड बुरुज शत्रूला दरीतच अडकवून ठेवण्यासाठी होती.
मुख्य किल्ला, माची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3,660 चौ. मी., तर मुख्य किल्ल्याचे 3,885 चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज 10 ते 15 मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी रेडका, राजपहारा, केदार इ. बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. बुरूज वैशिष्ट्यपूर्ण असून निमुळत्या डोंगर धारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी), तोरणा ( झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांना आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी तब्बल 40 फूट उंच असून तिच्या भक्कम रचनेमुळे प्रतापगड अभेद्य बनला होता. संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणात केले गेले आहे. गडाच्या उंच बुरुजांवरून जावळीच्या खोऱ्यातील डोंगर-दऱ्यांवर सतत नजर ठेवता येत असे, त्यामुळे शत्रूच्या हालचाली वेळेत ओळखणे सोपे होत असे.
No comments:
Post a Comment