महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी
- पणन मंत्री जयकुमार रावल
वर्ल्ड फूड इंडिया 2025 प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, 27 :भारत मंडपम, नवी दिल्ली येथे 25 ते 28 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे प्रदर्शन भारताच्या कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे. या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात जगभरातील उत्पादक, खरेदीदार, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांनी सहभाग घेतला असून, महाराष्ट्राने या संधीचा प्रभावीपणे लाभ उठवला आहे. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन करत राज्यातील कृषी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला.
मंत्री जयकुमार रावल यांनी उद्घाटनानंतर सांगितले की, वर्ल्ड फूड इंडिया 2025 मध्ये सहभाग घेण्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देणे, नव्या गुंतवणुकीला आकर्षित करणे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे हा आहे. महाराष्ट्र हे द्राक्षे, संत्री, आंबा, केळी, डाळिंब, पेरू यांसारख्या फळांचे आणि हळद, मिरची, लसूण यांसारख्या मसाल्यांचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यासाठी पॅकिंग, प्रक्रिया, लॉजिस्टिक आणि ब्रँडिंग यामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रदर्शनाचे व्यासपीठ या सुधारणांसाठी एक उत्तम संधी ठरेल, असे मंत्री श्री. रावल यांनी अधोरेखित केले.
No comments:
Post a Comment