बांबूपासून इथेनॉल आणि मिथेनॉल निर्मितीतून
इंधन निर्यातदार देश होण्याची भारतात क्षमता
बांबू दिनानिमित्त आयोजित बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी
कार्यक्रमातील चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत
मुंबई, दि. 18 : बांबू पासून निर्माण होणारे विविध पिकांचे इंधन हे जागतिक भविष्य असून इथेनॉल आणि मिथेनॉल निर्मितीतून भारत जगातील मोठा हायड्रोजन इंधन निर्यातदार होऊ शकतो. भारतातील शेतकरी आणि उद्योजकांमध्ये ती क्षमता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. जागतिक बांबू दिनानिमित्त फिनिक्स फाऊंडेशन, लोदगा (लातूर) आणि मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या घोषवाक्याखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चर्चासत्रात बोलताना हे मत व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबईं येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञांच्या सहभागाने विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात बांबू पासून ऊर्जा निर्मिती आणि उपयोगाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणातील त्याचे योगदान तसेच शाश्वत विकासात बांबूची भूमिका यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
बांबू हे पडीक जमिनीत ही चांगले उत्पादन देणारे पीक आहे. अशा पडीक जमिनीवर बांबूची लागवड करून त्यातून बायो कोळसा, बायो डिझेल, इथेनॉल, मिथेनॉल अशी उत्पादने घेता येतील. यातून शेतकरी, उद्योजक यांना चांगला फायदा होईल. तसेच देशाची अर्थ व्यवस्था भक्कम होण्यास आणि पर्यावरण संवर्धनास मदत होईल. औष्णिक विद्युत प्रकल्पात बायो कोळशाचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच मिथेनॉल निर्मिती साठीही शासनाने प्रोत्साहन दिले तर देश ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल. शेतकरी आत्मनिर्भर होऊन देश ही आत्मनिर्भर होईल.
या चर्चासत्रात राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल, दिनेश वर्मा, गुरुदीप सिंग, अनिल बावजे, तुषार पाटील यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment