बांबू लागवड शेतकऱ्यांना लखपती बनवणारी
- ‘मनरेगा’चे महासंचालक नंदकुमार
मुंबई, दि. १८ : बांबू लागवड ही एक उत्तम आर्थिक आणि पर्यावरण संरक्षण करून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा फायदेशीर आणि शाश्वत स्रोत बनण्यासोबतच, पर्यावरणाच्या संवर्धनातही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा विचार करणे फायदेशीर ठरणारे असून शेतक-यांना लखपती बनवणारे हे पीक असल्याचे ‘मनरेगा’चे महासंचालक नंदकुमार यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त चर्चासत्र झाले. यावेळी डेहराडून संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अजय ठाकूर, कोल्हापूर येथील बांबू उत्पादक शेतकरी अमित पाटील, केरळ वन संशोधन संस्था (केएफआरआय माजी प्रमुख शास्त्रज्ञ (वन अनुवंशशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान विभाग) डॉ. ई. एम. मुरलीधरन सहभागी झाले. फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर्स, नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक मुकेश गुलाटी यांनी पॅनेल चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
मान्यवरांनी बांबू लागवडीचे फायदे नमूद करताना सांगितले की, पडीक व माळरानावर बांबू लागवड अत्यंत फायदेशीर आहे. बांबूची लागवड आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम करणारी आहे. बांबू लागवड पर्यावरणासाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे, बांबू मातीची धूप रोखून तापमानवाढ कमी करण्यास मदत करते. बांबू लागवड जर योग्य मार्गदर्शनातून केली तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टर अधिक उत्पन्न मिळू शकते. बांबूला ऊसापेक्षा जास्त दर मिळतो आणि उत्पादन देखील चांगले असते.राष्ट्रीय बांबू लागवड अभियानातंर्गत शेतक-यांना बांबू लागवडीसाठी सात लाख रूपये मदत दिली जाते. बांबूचा उपयोग बांधकाम,फर्निचर, कागद निर्मिती, ऊर्जा आणि हस्तकला अशा अनेक उद्योगांमध्ये होतो.ज्यामुळे त्याची मागणी कायम असते. बांबूची मुळे जमिनीत घट्ट पकड घेतात,त्यामुळे मातीची धूप रोखली जाते. बांबूची लागवड प्रदेशनिहाय वेगवेगळी करणे गरजेचे आहे.शासनाकडून बांबू लागवडीसाठी उत्कृष्ट दर्जाची रोपे वितरण करणे यासाठी अधिकृत केंद्राची उपलब्धता करुन देण्यात यावी. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणार हा व्यवसाय आहे. काही कालावधीनंतर या पिकाची कमी मनुष्यबळात देखरेख करता येते. कोल्हापूरचे बांबू उत्पादक शेतकरी अमित पाटील यांनी १५० एकर डोंगर क्षेत्रात केलेली लागवड आणि त्यापासून मिळालेले फायदे याची माहिती सविस्तर सांगितली. डॉ. ई. एम. मुरलीधरन यांनी बांबू लागवड शास्त्रशुध्द पध्दतीने करण्यासाठी शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे असे सांगितले. डॉ. अजय ठाकूर यांनी बांबू लागवडीसाठी कोणती रोपे प्रदेशनिहाय आवश्यक आहेत याची माहिती दिली
No comments:
Post a Comment