राज्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त व दर्जेदार
- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल-दुरुस्ती कामांसाठी १२९६.०५ कोटींच्या निधीस मान्यता
मुंबई, दि. २३ :- राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत २०२५-२६ या कालावधीसाठी ₹१२९६.०५ कोटी निधीस मंजुरी दिली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, रस्ते हे राज्याच्या प्रगतीच्या प्राणवाहिन्या आहेत. सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ते निर्मिती सरकारचे प्राधान्य आहे. या निधीच्या मंजुरीमुळे तातडीची दुरुस्ती कामे तर होणारच आहेत, शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या कामांमध्ये पारदर्शकता आणली जाणार आहे. तसेच वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेमुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. खड्डेमुक्त, सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध होतील. प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होईल. अपघात रोखता येतील. रस्त्यांच्या आजूबाजूला हरित पट्टा तयार होऊन पर्यावरण संतुलन राखले जाईल. डिजिटल साधनांमुळे कामांवर प्रभावी नियंत्रण मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment