राज्यातील 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण;
उर्वरित विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीसाठी विशेष शिबिरे
मुंबई, दि. 5 : राज्यातील दोन कोटी चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 93.51 टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण शालेय शिक्षण विभागामार्फत पूर्ण झाले आहे. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणाकरीता विभागामार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. आता उर्वरित विद्यार्थ्यांची प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (आधार)(UIDAI) सहकार्याने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.
राज्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करुन अशा आधारधारक मुलांची नोंद संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत सरल प्रणालीअंतर्गत करण्यात येते. शिक्षण विभागाकडील विविध लाभाच्या योजनांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी देखील आधार क्रमांक प्रमाणीकरण आवश्यक आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमामध्ये समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांची आधार पडताळणी करण्याचे काम प्राधान्याने करण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. शिक्षण विभागाने प्रत्येक गटसाधन केंद्रावर दोन असे एकूण 816 आधार संच उपलब्ध करुन दिलेले आहेत. विविध माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि आवश्यक दुरुस्ती दोन्ही कामे सध्या गटस्तरावर सुरू आहेत. तथापि, आधार प्राधिकरणामार्फत विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील माहितीमध्ये विसंगती आढळून येत असल्यामुळे पडताळणी प्रलंबित राहत आहे.
No comments:
Post a Comment