महसूल अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे
-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे महसूल यंत्रणेला आदेश
मुंबई, दि. 31 : महसूल विभागामार्फत वर्षभर विविध लोकोपयोगी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. या योजना आणि उपक्रमांचा लाभार्थ्यांना एकत्रित लाभ मिळवून देण्यासाठी 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल अभियान राबविण्यात येत आहे. महसूल विभागामधील अधिकारी, कर्मचारी यांनी या कालावधीत लोकाभिमूख कार्य करुन प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे आणि या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
महसूल अभियानाच्या अंमलबजावणीबाबत मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस मंत्रालयातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय पातळीवरील सर्व अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, या अभियान कालावधीत सात दिवसात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध योजनांच्या प्रमाणपत्रांचे वितरण, शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीची अतिक्रमणे नियमित करुन घरकुल योजनेंतर्गत पट्टे वाटप, पांदण/ शिवपांदण रस्त्यांची मोजणी करुन दुतर्फा वृक्ष लागवड, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करुन प्रलंबित प्रकरणांच्या सुनावण्या पूर्ण करणे, तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन डीबीटीच्या प्रलंबित अडचणी सोडविणे, शासकीय जागा दिलेल्या व्यक्ती/ संस्थांनी शर्तभंग केला असल्यास अतिक्रमणे तोडून जागा शासनाकडे परत घेणे, कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देणे आदींचा समावेश असणार आहे.
याचबरोबर सर्वांनी 5 ऑगस्ट रोजी ग्रामसंवाद आयोजित करुन महसूल प्रशासन लोकाभिमूख काम करीत असल्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची सूचना मंत्री श्री.बावनकुळे यांनी केली. नियोजित उपक्रमांबरोबरच अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, ते विविध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावेत, सर्व उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
राज्य शासन लोकाभिमूख योजना राबवून गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे. त्यानुसार हे महसूल अभियान आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट अभियान ठरेल आणि नागरिकांना योजनांचा लाभ विनाविलंब मिळेल यासाठी संपूर्ण यंत्रणेने काम करावे, असे सांगून या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी दिली.
No comments:
Post a Comment