समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे
विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे
-सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई
§ डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा उत्साहात
नागपूर, दि. 02 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित शैक्षणिक दर्जा मिळवत डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजाला शिक्षणाची दारे उघडे करून दिली व त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविले. गेल्या ६० वर्षांची गौरवशाली परंपरा असणारे हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास विस्तारून नवनवीन शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून या महाविद्यालयाने कार्य करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दीक्षाभूमी स्मारक समिती संचालित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचा प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर,दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य डॉ. कमलताई गवई , सुधीर फुलझेले,राजेंद्र गवई, प्रदीप आगलावे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेचे राज्य, संधिची समानता आणि प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार व ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्याच्या विचारांचा वारसा पुढे घेवून जाणे गरजेचे आहे. बाबासाहेबांचे धम्म परिवर्तनाचे महान कार्य याच मातीत घडले आहे. डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने वंचितांना शिक्षणाची दारे उघडी करून त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविले. बाबासाहेबांना अपेक्षित शैक्षणिक दर्जा या महाविद्यालयाने मिळविला आहे. पद्मश्री दादासाहेब गायकवाड, माजी राज्यपाल दादासाहेब गवई, सदानंद फुलझेले आदींच्या अथक प्रयत्नाने केवळ ५ वर्ग खोल्या, ५ शिक्षक आणि ३०० विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेला या महाविद्यालयाचा प्रवास हिरक महोत्सवी वर्षात ६ हजार विद्यार्थी संख्या ५० वर्ग खोल्या आणि ४० प्राध्यापक अशा गौरवपूर्ण स्थितीत येवून पोहचला आहे. महाविद्यालयाने विविध शैक्षणिक मानकांमध्ये सरस कामगिरी केली असून या महाविद्यालयाच्या विविध विद्या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
No comments:
Post a Comment