दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत;
महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा
नवी दिल्ली, 27: राजधानी दिल्ली येथे आज ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या निनादाने गणरायामय झाली. लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्र सदनासह दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील गणेशोत्सव मंडळांनी भक्तीपूर्ण उत्साहात साजरे केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र सदनात गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून या उत्सवाचा भक्तीमय प्रारंभ केला.
यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्रात राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने दिल्लीतील मराठी बांधवांमध्ये विशेष उत्साह संचारला आहे. पुढील दहा दिवस दिल्लीत भक्ती, उत्साह आणि मराठमोळ्या सांस्कृतिक जल्लोषाचे वातावरण राहणार आहे.
महाराष्ट्र सदनात गणरायाचे भव्य स्वागत
महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा खा. डॉ श्रीकांत शिंदे यांनी केली. यावेळी निवासी आयुक्त आर. विमला, अपर निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक मनिषा पिंगळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकार, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, लेखा अधिकारी निलेश केदारे यासह अनेक अधिकारी, कर्मचारी आणि गणेशभक्त उपस्थित होते. सकाळी कोपर्निकस मार्गावर काढण्यात आलेली मिरवणूक ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने दुमदुमली. ढोल-ताशांचा गजर आणि मंत्रोच्चारांनी गणरायाची प्राणप्रतिष्ठा थाटामाटात संपन्न झाली.
गणरायाच्या स्वागताने दिल्लीत मराठी संस्कृतीचा ठसा पुन्हा एकदा ठळकपणे उमटला आहे. हा उत्सव भक्ती आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुपम संगम असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा उत्साह संपूर्ण दिल्लीला सांस्कृतिक रंगात रंगवणार आहे, असे निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment