बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये सुधारणा विधेयक पुढील अधिवेशनात आणणार
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई दि.१७:- बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर यांच्याकडूनही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सूचना मागवून बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी पुढील अधिवेशनात विधेयक आणले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
राज्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदस्य मनोज जामसुतकर, सदस्य अतुल भातखळकर आणि सदस्य अजय चौधरी यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, बॉम्बे नर्सिंग अॅक्टमधील मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा मिळाव्यात, शासकीय नियमांचे पालन व्हावे यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व खाजगी रुग्णालय तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २३ हजार ३५३ रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये मुंबई नर्सिंग ॲक्ट मधील आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल ५ हजार १३४ रुग्णालयांना नोटीस देऊन सुधारणा करण्यासाठी सूचित करण्यात आले. त्यानंतर ४ हजार ८७६ रुग्णालयांची पुनर्तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्रुटी राहिलेली रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्याची मोहीम राज्यात प्रथमच राज्यस्तरावरून राबवण्यात आली. यापूर्वी तपासणीचे काम सिव्हिल सर्जन व महापालिकास्तरावर केले जात होते. यापुढे प्रत्येक वर्षी तसेच दरवर्षी ही तपासणी मोहीम राबविण्यात येणारा असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
०००००
No comments:
Post a Comment