वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न-ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारी सर्वोत्तम व्हावी, वारकऱ्यांना त्रास होता कामा नये, याकरिता त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत विविध सेवाभावी संस्था, विश्वस्त आदी घटका अहोरात्र काम करुन मनोभावे सेवा करीत आहेत. वारकऱ्यांकरिता पालखीतळावर सुविधा देण्याच्यादृष्टीने जर्मन हँगरसह, वैद्यकीय सुविधा, महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहे, मसाज मशीन आदी सर्वोत्तम सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला. वारी दरम्यान प्रशासनाच्यावतीने केलेल्या व्यवस्थेबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे श्री. गोरे म्हणाले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, त्र्यंबकेश्वर यांसह विविध भागातून महिला वारकरी वारीत सहभागी होतात. या सहभागी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छताविषयक बाबींचा विचार करुन महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ४ वर्षापासून 'आरोग्य वारी' उपक्रम प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महिलांकरिता हिरकणी कक्ष, ३७५ ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या, असे श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरण सेवेचे महत्त्व लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पालखी सोहळयात कक्षाच्यावतीने प्रथमच 'चरणसेवा' उपक्रम राबविण्यात आला. २ कोटी ७५ हजार वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली. एकूण लोकसहभातून २ कोटी रुपयाहून अधिक निधी उपलब्ध झाला. ९ हजारहून अधिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा केली, चरणसेवा सेवा उपक्रमाबाबत वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचे श्री. नाईक म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, 'निर्मल दिंडी' उपक्रमाअंतर्गत ११ हजार शौचालय, १५५ हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन, नॅपकिन बर्निंग इन्सिनरेशन, लहान बालकांकरिता खेळणी वस्तू आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. स्वच्छतेच्या कामाकरिता सुमारे १ हजार २३६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही श्री. जगंम यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले, तसेच निर्मल दिंडी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या वतीने पालखी सोहळ्यात राबविण्यात आलेल्या 'चरण सेवा' उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता काम केलेल्या अधिकारी, सेवाभावी संस्था, कार्यकर्त्याचा तसेच आरोग्यवारी उपक्रमात उल्लेखनीय काम केलेल्या संस्थांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, विकास अधिकारी सुशील संसारे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात 'निर्मलदिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाबाबत माहितीपट दाखविण्यात आले.
No comments:
Post a Comment