माहीम मोरी रोड शाळेच्या इमारतीसाठी
निधीबाबत सूचना देऊ
- उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १६ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील माहीम मोरी रोड महापालिका शाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनात सूचना दिल्या जातील असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य महेश सावंत यांनी माहीम मोरी रोड महापालिका शाळेच्या इमारती संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली.
उद्योग मंत्री श्री सामंत यांनी सांगितले, बृहन्मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभागातील माहीम मोरी रोड महापालिका शाळा ही तळ मजला व ३ मजले अशी ४ मजल्यांची इमारत होती. या इमारतीचे २८ सप्टेंबर २०२० रोजी परीक्षण केले आणि शाळेची इमारत ही सी-१ या प्रवर्गात (धोकादायक ईमारत) करण्यात आले. त्यानंतर या शाळेची इमारत निष्कासित करण्यात आली. या शाळेच्या पुनर्बांधणीकरिताचा प्रस्ताव मुंबई अग्निशामक दल व इमारत प्रस्ताव (विशेष कक्ष) यांच्या मंजुरीकरिता पाठवण्यात येत असून हे काम सन २०२५- २०२६ या आर्थिक वर्षात हाती घेण्याचे नियोजित असल्याचे त्यांनी सांगितले.
माही मोरी रोड महापालिका शालेय इमारतीतील चार शाळांची सन २०१९-२०२० साळी एकूण पटसंख्या १५६८ होती. या शाळेची इमारत निष्कासित करण्यात आल्याने या शाळांपैकी माहीम मोरी रोड उर्दू क्रमांक एक व दोन या दोन्ही शाळा आर.सी. चर्च माहीम या शालेय इमारती स्थलांतरित करण्यात आल्या. उर्वरित मराठी व इंग्रजी शाळा न्यू माहीम महानगरपालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment