राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव
- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. १८ : शेकडो वर्षाची घरगुती गणेशोत्सव परंपरा व अनेक वर्षापासूनची सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदू आहे. त्यामुळे राज्यात आता गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे केली.
मंत्री ॲड. शेलार म्हणाले, गणेशोत्सवाचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड व्हावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर ठळक व्हावे, यासाठी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
राज्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचा पाया सामाजिक एकरुपतेने घातलेला आहे. ही एकरूपता निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाने मोलाची भूमिका पार पडलेली आहे. गणेशोत्सवाचे परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्यास आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि राज्याचा प्रत्येक नागरिक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या या महोत्सवाशी जोडला जाण्यासाठी राज्य महोत्सव होणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासन सुलभकर्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment