अद्रक संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत सरकार सकारात्मक
- कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. 17 : राज्यात अद्रक उत्पादन क्षेत्र वाढत असताना अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्यास शासनाची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत धोरणात्मक निर्णयानंतर ठोस पावले उचलली जातील, असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य सतीश चव्हाण यांनी अद्रक पीक संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, तेव्हा मंत्री ॲड.कोकाटे बोलत होते. या लक्षवेधी दरम्यान सदस्य शशिकांत शिंदे यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.
या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री कोकाटे म्हणाले की, देशात अद्रक लागवड 18 हजार हेक्टर क्षेत्रावर होत असून 5,345 हेक्टर क्षेत्र हे महाराष्ट्रात आहे. यामध्ये सातारा आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये अद्रकचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत मौजे गल्लेबोरगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव 2022 मध्ये मंजूर करण्यात आला होता. पुण्यातील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत सुमारे 20.61 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, नियोजन विभागाने वित्तीय भाराच्या कारणावरून संमती न दर्शवल्यामुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे.
कोकाटे यांनी स्पष्ट केले की, राज्यात सध्या 76 संशोधन केंद्रे आणि 109 अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प कार्यरत आहेत. मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत 18 केंद्रे आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन केंद्र स्थापन करण्याऐवजी विद्यमान केंद्रांचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण करण्यासाठी प्रस्ताव पाठविला जाईल.
सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्रात हळदसह अद्रक पिकावरही संशोधन सुरू आहे. तसेच वसमत येथील केंद्रातही अद्रकवर संशोधन करता येईल का, याचा अभ्यास केला जात आहे.
कृषी मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले की, याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक घेऊन अद्रकसह इतर पिकांच्या संशोधनासाठी धोरण ठरवले जाईल. धोरण ठरल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.
No comments:
Post a Comment