गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार
मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा सुरळीत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात 50 एमबीए क्षमतेचं उच्चदाब रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे संयंत्र मोठे असल्याने लगेचच नवीन रोहित्र उपलब्ध करून देता आले नाही. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना म्हणून 25 एमबीए क्षमतेचे रोहित्र बसवण्यात आले आहे. मात्र यामुळे काही प्रमाणात विजेचा विस्कळीत पुरवठा होत आहे. हे लक्षात घेऊन नवीन 50 एमबीए क्षमतेचं रोहित्र बसवण्याचे काम सुरू असून ते 22 जुलैपर्यंत ते पूर्ण होईल.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून देवरी येथे 100 एमबीए क्षमतेचे नवीन ईएचव्ही सबस्टेशन उभारण्यात येत आहे. त्यासोबतच दुसरे एक ईएचव्ही सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून 30 जुलैपर्यंत वर्क ऑर्डर दिली जाईल. पुढील दीड वर्षांत हे काम पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.
त्याचबरोबर आमगावमध्ये डिसेंबरपर्यंत एक नवीन कॅपेसिटर बँक उभारण्यात येणार आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होईल आणि वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या सुटेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment